भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात प्रथम आलेल्या गुणवंतांचा गौरव शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाकडून करण्यात आला. विज्ञान शाखेतून गुणानुक्रमे प्रथम आलेली नवजीवन विद्यालय जमनापूर विद्यालयाची विद्यार्थीनी मेहनिश जहीर पटेल व गांधी विद्यालय कोंढा येथील विद्यार्थी गौरव जीभकाटे, कला शाखेतून जिल्ह्यात प्रथम आलेला गांधी विद्यालयाचा विद्यार्थी रूपचंद सजन पचारे तसेच वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात प्रथम आलेली भंडारा येथील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची शिखा मुरलीधर जसवानी यांचा गौरव जिल्हा परिषद (माध्यमिक) शिक्षण विभाग व भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मंगला गोतारने, गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा, शिक्षण विस्तार अधिकारी (प्राथमिक ) पुष्पकला शहारे, शिक्षण विस्तार अधिकारी (माध्यमिक) सुरेखा रेहपाडे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नितीन वाघमारे,भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव राजू बांते, माजी प्राचार्य देवानंद चेटूले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ सत्कार केला. तसेच विद्यार्थी व त्यांच्या आई – वडिलांना पेढा भरवला. यावेळी उपशिक्षणाधिकारी मंगला गोतारने यांनी, अंतिम लक्ष पूर्ण होईपर्यंत थांबू नका. नेहमीच अभ्यासात अपडेट रहा. गुणवत्तेचा आलेख कमी होवू देवू नका. शिक्षणात प्रतिकूल परिस्थिती आड येवू देवू नका याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुणवंत विद्यार्थ्यांनीही भविष्यात असलेल्या ध्येयाविषयी मनमोकळी चर्चा केली.