भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील विविध चकमकींमध्ये सहभागी राहिलेल्या एका जहाल नक्षल्याने आज गडचिरोली येथे केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. गणेश गट्टा पुनेम (वय ३५) असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव असून, तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील बेच्चापाल येथील रहिवासी आहे. गणेश पुनेम हा २०१७ मध्ये छत्तीसगड राज्यातील भैरमगड भागातील नक्षल्यांच्या पुरवठा समितीत सहभागी झाला. २०१८ पर्यंत तो या समितीचा उपकमांडर होता. २०१७ मध्ये छत्तीसगडच्या मिरतूर आणि २०२२ मध्ये तिम्मेनार येथे झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आज गणेश पुनेम याने केंद्रीय राखीव दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक जगदीश मीणा यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला गडचिरोली जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय राखीव दलाचे उप कमांडंट नितीन कुमार उपस्थित होते. २०२२ पासून आतापर्यंत २२ नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवादविरोधी अभियानामुळे, तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी उपलब्ध करून दिल्याने २०२२ ते २०२४ या कालावधीत आतापर्यंत एकूण २२ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.