भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पाळीव जनावरांना धुत असताना पाणी घरासमोर गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून आरोपी भावांनी बाप-लेकांवर काठीने मारहाण करून जखमी केले. त्यात वडील महादेव बोंद्रे याचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी विक्की चंद्रशेखर मते याला ७ वर्षाचा सश्रम कारावास व ७५ हजारांचा दंड तर आरोपी भाऊ मयुर मते याला ३ महिन्याचा सश्रम कारावास व २५ हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. दि. २९ मे रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधिश पी.एस. खुणे यांनी सुनावली आहे. माहितीनुसार, मानेगाव बाजार येथील महादेव बोंद्रे व विक्की मते यांच्या ४-५ वर्षापासून वाद असून एकमेकांशी पटत नाही. दि. ११ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी महादेव बोंद्रे हा आपले पाळीव जनावरे धुत असताना तो पाणी आरोपी विक्की मते याच्या घरासमोर गेल्याने भांडण केले. भांडण सुरू असताना मुलगा दिनेश बोंद्रे शेतातून घरी आला. तेव्हा मुलाने आरोपी भावांना समजाविले. तेव्हा चंद्रशेखर मते यांनी बाप लेकांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी दिनेश बोंद्रे व त्याचे वडील महादेव बोंद्रे यांना मारपीट करीत असताना आरोपी विक्की मते याने घरातून काठी आणून महादेव बोंद्रे यांचे डोक्यावर मारून जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर आरोपी मयुर याने दिनेश बोंद्रे याला मारून जखमी केले. तत्कालीन कारधाचे ठाणेदार राजेश थोरात यांनी आरोपींना अटक करून तपास केला. प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
सदर प्रकरण अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधिश पी. एस. खुणे याच्या न्यायालयात चालला. सरकारी पक्षातर्फेअभियोक्ता व्ही. बी. भोले यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकूण साक्षपुरावे तपासून निर्णय दिला. न्यायालयाने महादेव बोंद्रे याला जिवानीशी ठार मारल्यावरून कलम ३०४, ३०८ भादंवी मध्ये ७ वर्षे सश्रम कारावास व ७५ हजार रुपए दंडाची शिक्षा सुनावली. तर आरोपी मयुर मते याला कलम ३०८ भादंवी मध्ये ३ महिने सश्रम कारावास व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर सरिता चंद्रशेखर मते हिला कलम ३२३ भादंवीमध्ये दोष सिद्ध झाल्याने चांगल्या वागणूकीबद्दल न्यायालयाने दोन वर्षाच्या बॉण्डवर मुक्त करण्यात आले. सदर प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अशोक बागूल, ठाणेदार गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात पो.हवा.सुकरू वल्के यांनी न्यायालयात पैरवी केली.