भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी संध्याकाळपासून कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकात ध्यानधारणा सुरू केली आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांकडूनही पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पंतप्रधान मोदींच्या ध्यान करण्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील पाणी टंचाईवरून शिंदे सरकारलाही लक्ष्य केलं आहे.
नाना पटोले हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौºयावर आहेत. तिथे ते दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. यादरम्यान, त्यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेवर खोचक शब्दांत टीका केली. पंतप्रधान मोदींनी आता कायम ध्यानधारणा करावी, असे ते म्हणाले. तसेच आता निवडणुकीचा प्रचार संपला असून त्यांनी काय करावं, हा त्यांचा मुद्दा आहे, अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिली. याशिवाय आज माध्यमांमध्ये मोदी इथे आहेत, उद्या तिथे आहेत, हे दिवसभर दाखवलं जात आहे. ही गंभीरबाब आहे. आज जनतेचे अनेक प्रश्न आहेत. महागाईने लोक त्रस्त झाली आहेत. बेरोजगारी आहे. लोकांना पिण्याचं पाणीही मिळत नाही. आमच्यासाठी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, असंही नाना पटोले म्हणाले.