भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती या विषमतेने बरबटलेल्या, जातीयवादी वर्णव्यवस्था व चातुर्वण बळकट करणाºया, शूद्र व महिलांचे माणूस पण नाकारणाºया, बहुजन समाजावर गुलामगिरी लादणाºया, माणसाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणाºया व माणुसकीला काळीमा फासणाºया मनुस्मृतीतील श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून वर्णव्यवस्था, श्रेष्ठ कनिष्ठ व अंधश्रद्धेची मनुस्मृतीची शिकवण विद्यार्थ्यांच्या गळी उतरवून त्यांना विज्ञानवादी बनवण्याऐवजी विषमतावादी, धर्मांध व अंधश्रद्धाळू बनविण्याचे आणि राष्ट्रीय एकता व एकात्मता धोक्यात आणण्याचे षडयंत्र आखल्या जात आहेत. या षडयंत्राला संविधान परिवार व इतर सामाजिक संघटना तीव्र विरोध करीत असून मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करू नका या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आले. महाराष्ट्र हा शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जातो. अशा या पुरोगामी महाराष्ट्रात मनुस्मृती सारख्या प्रतिगामी, विषमतावादी, वर्ण श्रेष्ठत्वाचे धडे देणाºया, जातीयवादाला खतपाणी घालणाºया व अंधश्रद्धेला पूरक ठरणाºया मनुस्मृती या ग्रंथातील श्लोक शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे हे देशाला विकासाऐवजी अधोगतीकडे नेणारे ठरेल.
म्हणून शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील कोणत्याही श्लोकाचा समावेश करण्यात येऊ नये असे विनंती वजा निवेदन संविधान परिवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी अँड रिसर्च सेंटर, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, शिंगोरी बुद्ध विहार ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, शिक्षण सुधार अभियान समिती, खाजगी माध्यमिक शिक्षक संघ, संविधान अमृत महोत्सव समिती, संविधान बचाव संघर्ष समिती, समता सैनिक दल, आभास बहुउद्देशीय संस्था, इत्यादी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात अमृत बन्सोड, महेंद्र गडकरी, गुलशन गजभिये, महादेव मेश्राम, आहुजा डोंगरे, मन्साराम दहिवले, इंजि.रूपचंद रामटेके, प्रा. रमेश जांगडे, अजय तांबे, रोशन जांभुळकर, अॅड. डी.के.वानखेडे, डी. एफ. कोचे, राजकुमार बन्सोड, किरण मेश्राम यांच्या समावेश होता.