भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर दर दिवशी सुमारे २०० ते २५० ट्रॅक्टर धान शेतकरी विक्री करण्याकरिता आणत आहेत. त्यामुळे मार्केट यार्ड ट्रॅक्टरची मोठी गर्दी बघायला मिळते. शासनाने रब्बी हंगामात धान खरेदी केंद्र सुरू केले; परंतु त्या केंद्राकडे शेतकºयांनी पाठ दाखवली आहे. येथील व्यापारी शेतकºयांना धानाचा चुकारा तात्काळ देतात, त्यामुळे मार्केट यार्डात धानाची दररोज विक्रमी आवक होत आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यांत खरिपात धानाचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते, तसेच रब्बीमध्ये सुद्धा धानाची मोठी लागवड तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. शासनाने त्याकरिता रब्बी हंगामातही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले आहे; परंतु जिल्हा पणन विभागाच्या नियोजनाअभावी केंद्र अत्यंत कमी व उशिरा सुरू झाले.
या केंद्रात विक्री केलेल्या धानाचा मोबदला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांनी शासकीय आधारभूत केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. शासकीय खरेदी केंद्रावर ठोकळ अथवा बारीक धानाचा भाव हा २,१८३ रुपयेप्रतिक्विंटल आहे, तर बाजार समितीमध्ये दर दिवशी व्यापारी बोली करतात तिथे या धानाचा भाव सुमारे १,९०० ते २,००० रुपये इतका जातो. त्यामुळे शेतकरी बाजार समितीवर धान विक्री करण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत आहे. येथील व्यापारी सर्वच धानाची खरेदी करून त्यांच्या मोबदला त्यांना त्याच दिवशी किंवा दुसºया दिवशी तात्काळ देतात. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्राकडे या शेतकºयांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. सरकार धान खरेदी केंद्र सुरू केल्याचे सांगत असले तरी त्याकडे शेतकºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पणन विभागाच्या नियोजनाचा अभाव व नियमांचा मारा, यामुळे ही स्थिती आहे.