भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अन्न पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची मुंबई येथे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र चालकांच्या समस्या संदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र राज्यातील धान खरेदी करणाºया संस्थांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी १ नोव्हेंबर २०२३ ला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगनजी भुजबळ यांचे अध्य्षतेखाली सह्याद्री मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत धान खरेदी संस्थांची कमी केलेली घट पूर्ववत करणे, कमी केलेली कमिशन पूर्ववत करणे,जुने असलेले हमालीचे दर वाढवणे,इत्यादी मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.परंतू आजतागायत तसा शासन परिपत्रक काढण्यात आला नाही. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी दि .३१ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांची मुंबई येथील त्यांचे कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याला वित्त विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव वित्त विभागाला पुढील आठवड्यात पाठवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी धान खरेदी संघाचे तुमसर तालुका अध्यक्ष अनिल टेकाम प्रामुख्याने उपस्थित होते.