भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाविकास आघाडी (काँग्रेस)विरुद्ध महायुती (भाजप) अशी थेट लढत असलेल्या भंडारागोंदिया लोकसभेत महाविकास आघाडीचे कॉँग्रेस उमेदवार डॉ.प्रशांत पडोळे हे विजयी झाले असुन वृत्तलिहेपर्यंत त्यांनी ५० ते ५५ हजार मतांची आघाडी घेतली होती. भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली.पहिल्या फेरीपासुनच कधी भाजप तर कधी काँगे्रसचा उमेदवार हा आलटुन पालटुन आघाडी घेत होते.त्यामुळे निकालात चुरस निर्माण झाली होती.मात्र बाराव्या फेरीनंतर काँग्रेस उमेदवार डॉ.प्रशांत पडोळे यांनी विजयी आघाडी घेण्यास सुरूवात केली व ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहीली.विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र हे भाजपसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणुन ओळखल्या जाते मात्र यंदाच्या निवडणुकीत जनतेने तब्बल २५ वर्षानंतर या मतदार संघात लोकसभेची निवडणुक लढविणाºया काँग्रेसवर विश्वास टाकत डॉ.प्रशांत पडोळे यांचा विजयाचा मार्ग सुकर केल्याचे दिसुन येते. सुनील मेंढे यांना सुरुवातीपासून फक्त भाजपचे आमदार असलेल्या तिरोडा व अपक्ष आमदार असलेल्या गोंदिया या दोन विधानसभा क्षेत्रात आघाडी मिळाली. मात्र इतर तुमसर, भंडारा, साकोली, अजुर्नी/ मोरगाव, या चारही मतदारसंघात ते मोठ्या फरकाने मागे पडत होते. यापैकी भंडारा, साकोली व मोरगाव अजुर्नी या तीन मतदारसंघात सुनील मेंढे यांना जोरदार फटका बसल्याने त्यांच्या विजयाची हॅट्रीक यावेळी हुकली.
भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकुण १८ उमेदवार असले तरी भाजपाचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यातच खरी लढत होणार हे सुरूवातीपासुन बोलल्या जात होते. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत येथे बसपाचे संजय कुंभलकर, वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार सेवक वाधाये यांची उमेदवारी अत्यंत महत्वाची मानली जात होती मात्र या तिन्ही उमेदवारांना त्यांना अपेक्षीत अशी मते मिळविता आले नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्यात लढत झाली होती. यात सुनील मेंढे यांनी ६ लाख ५० हजार २४३ मते, तर नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८५९ मते मिळाली होती. यात भाजपचे सुनील मेंढे हे १ लाख ९७ हजार ३९४ मतांनी विजयी झाले होते. तर बसपाच्या विजया नंदूरकर या ५२ हजार ६५९ मते घेऊन तिसºया क्रमांकावर होत्या, वंचितचे उमेदवार नान्हे यांना ४५ हजार ८४२ मते मिळाली होती.