भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री व भाजपाचे नेते नितीन गडकरी यांच्या विजयाची हॅट्रिक होताच नागपुरातील वर्धा मार्गावरील एन्रीको हाईटस समोर प्रचंड मोठया प्रमाणात फटाके फोडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला. नागपूर लोकसभा मतदारसंघांत गडकरी यांनी एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळविल्याचे समजताच ढोल ताशा पथकाने संपूर्ण परिसर दाणाणून टाकला होता. लोकसभा निवडणूकीच्या पहिल्याच टप्प्यात १९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मोजणी मंगळवारी सकाळी सुरु होताच सर्वांचे लक्ष कळमना मार्केट याडार्तील मतमोजणीकडे लागले होते. देशाचे केंद्र स्थान असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असल्याने विजयाची उत्सुकता कायम होती. दुपारनंतर एकामागोमाग एक फेरी पूर्ण होताच सातत्याने लीडकडे लक्ष लागले होते.
नागपुरात भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विजयाची हॅट्रिक केल्याच समजताच एकच विजयी जल्लोष करीत भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा लोंढा वर्धा मार्गावर एकत्रित आला. पुन्हा ढोल ताशाच्या गर्जरात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि मिठाईचे वाटप करीत विजयी जल्लोष केला. शहरातील अनेक मार्गावर ठिकठिकाणी गडकरींच्या विजयाचे होर्डिंग लागलेले दिसून आले. नितीन गडकरींच्या विजयाची चर्चा केवळ नागपुरातच नव्हे तर देशभरात होती