भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वत:ला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीनं वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे, अशी प्रतिक्रिया प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. केंद्रातील १० वर्षांच्या अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला ही मोठी चपराक असल्याचंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या कलांवर टिळक भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पटोले बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा असलेल्या महाराष्ट्राने खोक्याची व्यवस्था चालत नाही हे दाखवून दिलं असल्याचं ते म्हणाले.
संविधानाला पायदळी तुडवत राज्यातील मविआचे सरकार पाडलं, लोकशाही व संविधानाचा अपमान केला त्यांना जनतेने या निवडणुकीत चोख उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष एक नंबरचा करण्याचा संकल्प केलेला आहे, त्याची ही सुरुवात आहे. देशात नरेंद्र मोदींपेक्षा कोणी मोठा नाही, त्यांना कोणी अडवणार नाही या अहंकारी वृत्तीला जनतेने मोठी चपराक दिली आहे. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई पदयात्रेने देशातील चित्र बदलून टाकलं व जनतेनं राहुल गांधी यांना मोठं जनसमर्थन दिले. या पदयात्रेनं नरेंद्र मोदींशिवाय देशात नेता नाही यालाही उत्तर दिले व राहुल गांधी यांच्या गॅरंटीवर देशातील जनतेनेच शिक्कामोर्तब केले. लोकसभा निवडणुकीतील हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आहे,” असंही नाना पटोले म्हणाले.