भाजपचे अब कि बार ४०० चे स्वप्न भंगले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी चारशे पारचा नारा देत देशभरात उत्सुकता निर्माण केली होती. सर्व वृत्त वाहिन्यांनीही रालोआला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील, असे भाकीत केले होते. मात्र, मतमोजणीनंतर प्रत्यक्षात लागलेले निकाल सर्वांनाच आश्चयार्चा धक्का देणारे ठरले. रालोआला सलग तिसºयांदा केंद्रातील सत्ता कायम ठेवण्यात यश आले असले, तरी साध्या बहुमतावर समाधान मानावे लागले. रालोआला २९२ जागांवर समाधान मानावे लागले. तिथेच, इंडिया आघाडीने अनपेक्षित यश मिळवत २३४ जागांवर विजय मिळविला. निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सकाळपासूनच मतमोजणीचा कल क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा होता. कल आणि प्रत्यक्ष निकालांनी रालोआला ३०० चा आकडादेखील पार करू दिला नाही. भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा सहजपणे पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपाला जेमतेम २४० जागांपर्यंत मजल मारता आली. बहुमताच्या जादुई आकड्यासाठी ३२ जागा या पक्षाला कमी पडल्या.

उत्तरप्रदेशने दिलेला कौल यासाठी काही प्रमाणात कारणीभूत ठरला. उत्तरप्रदेशात सपाने भाजपाचा रथ रोखला आहे. या राज्यात केवळ ३३ जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले. दुसरीकडे सपाने ३७ जागांवर विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा आलेख काही प्रमाणात चढा राहिला. या पक्षाने ९९ जागांवर विजय मिळवला आहे. एक्झिट पोलमध्ये या पक्षाला कमाल ७० जागा मिळतील, असा कयास वर्तवण्यात आला होता. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनेही भाजपाचा मार्ग रोखला. या राज्यात सत्तेत असलेल्या तृणमूलने २९ जागांवर विजय मिळवला. दक्षिणेत द्रमुकला २२ जागा मिळाल्या. मात्र, भाजपाने केरळमध्ये खाते उघडले आहे. या राज्यातील थ्रिसूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुरेश गोपी यांनी सीपीआयचे आणि काँग्रेसचे उमेदवार के. मुरलीधरन् यांचा ७५,६८६ मतांनी पराभव केला. रालोआतील घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसमला १६ आणि बिहारमधील घटक पक्ष असलेल्या जदयूला १२ जागा मिळाल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *