भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा अनपेक्षित निकाल लागला. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांनी अक्षरश: विजय खेचून आणला. त्यांच्या विजयात विकास फाउंडेशनचे संस्थापक तथा तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. तेच पडोळे यांच्या विजयाची शिल्पकार असल्याची चर्चा आता मतदारसंघात होऊ लागली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. प्रशांत यादोराव पडोळे यांना ५,८१,६७८ तर भाजपाचे सुनील बाबुराव मेंढे यांना ५,४६,२२२ मते मिळाली. पडोळे यांचा ३५,४५६ मतांनी विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पाठिंबा व्यर्थ ठरल्याची चर्चा मतदार संघात जोर धरून आहे. पटेल यांनी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारादरम्यान संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. कधी नव्हे एवढ्या सभा घेतल्या आहे. मेंढे यांच्या पराभवाला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील भाजप नेते व कार्यकर्ते जबाबदार असले तरी सुनील मेंढेही तेवढेच जबाबदार असल्याचे बोलले जाते.
मेंढे यांच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी जेवढी तळमळ दाखवली तेवढी तळमळ भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी दाखविली नसल्याचे पहावयास मिळाले. मेंढे यांच्या पराभवाची मिमांसा होणे नक्कीच गरजेचे आहे. पुढे विधानसभा निवडणुक आहे. विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ. चरण वाघमारे यांनी नाना पटोले यांच्या नेतृत्वातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना त्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह पाठिंबा जाहीर केला होता. वाघमारे पडोळे यांच्या विजयासाठी भंडारा / गोंदिया लोकसभा क्षेत्रात प्रचाराची चांगलीच रणधुमाळी माजवली होती. यात विकास फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची चमू त्यांच्या पाठीशी उभी होती.
पटोले व वाघमारे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उभा ठाकला होता. आपण कुठेही कमी पडू नये म्हणून वाघमारे यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढला होता. अखेर त्यांच्या परिश्रमाला यश आले अन् पडोळे विजयी झाले. आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातून वाघमारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दावेदार ठरणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाने वाघमारे यांचे तिकीट कापून इंजि. प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिली. वाघमारे यांनी बंडखोरी करत स्वतंत्र निवडणूक लढली. त्यांचा ६ हजार मतांनी राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांनी पराभव केला. भाजपचे उमेदवार पडोळे यांची अमानत जप्त झाली. आता विधानसभा निवडणुकीसाठी चरण वाघमारे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. वाघमारे हे राष्ट्रीय काँग्रेसचे तुमसर मोहाडी क्षेत्रातून उमेदवार असतील त्याचे नवल वाटू नये.