भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहरातील शासकीय जमिनीवर डोळा ठेवून अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू आहे. याला प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि कारवाईचा अभाव कारणीभूत आहे. परिणामी अतिक्रमणकर्त्यांकडून शहरातील शासकीय जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. असाच प्रकार सुर्याटोला येथे सुरू आहे. येथील प्रसिध्द असलेला बांध तलाव पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. अतिक्रमणकर्त्यांनी तलाव खोदून जमिनीत रूपांतर करण्याचा डाव आखून पाऊल टाकले आहे. हा प्रकार सुरू असूनही प्रशासन आणि स्थानिक जनप्रतिनिधी डोळेझाक करीत आहे. त्यामुळे बांध तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून कारवाई करण्याची मागणी नागरीकांद्वारे केली जात आहे. शहरातील सुर्याटोला परिसरातील बांध तलाव नेहमीच अतिक्रमणकर्त्यांच्या रडारावर राहिला आहे. तलाव परिसरात यापुवीर्ही अतिक्रमण करण्यात आले होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेवून प्रशासनाला कारवाई करण्यास बाध्य केले. येथील रहिवासी असलेले सुर्यवंशी गुरूजी यांनी अतिक्रमणाला घेवून आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अतिक्रमण काढून बांध तलावाचे सौंदर्यीकरण केले होते. त्यामुळे बांध तलावाचे संरक्षण होऊन परिसराच्या सौंदर्यात भर पडली. तसेच बांध तलाव नागरिकांसाठी फेरफटका मारण्याचे ठिकाण म्हणून प्रसिध्द झाले.
तलावामुळे परिसरातील पाणी पातळी टिकून राहण्यास मदत झाली. परंतु, पुन्हा एकदा बांध तलावाला ग्रहण लावण्याचे काम सुरू झाले आहे. येथील रहिवासी असलेले देवाजी मानिकराव तुपकर व हरीराम बारबुध्दे यांनी बांध तलावावर अतिक्रमण करणे सुरू केले. तलावात जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करून तलावाचे पात्र सपाटीकरण केले जात आहे.
प्रशासनाने लाखो रुपए खर्च करून या तलावाचे सौंदर्यीकरण केले आहे. यातून तलाव समतल होऊन जमिनीत रूपांतर करण्याचा अतिक्रमणकर्त्यांचा डाव आहे. शिवाय या जमिनीवर शेती करण्याच्या उद्देशाने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे बांध तलावाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने लाखो रुपए खर्च करून या तलावाचे सौंदर्यीकरण केले होते. परंतु,अतिक्रमणकर्त्यांनी तलावावर डोळा ठेवून अतिक्रमणासाठी हालचाली गतिमान केल्याने तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देवून त्या अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सुर्याटोला येथील नागरिकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, यापुर्वीही अतिक्रमणाच्या समस्येला घेवून सुयार्टोला येथील रहिवासी सुर्यवंशी गुरूजी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करून बांध तलावाला संरक्षण दिले होते.