भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मागील दोन वर्षांपासून महानिर्मितीचे वीज उत्पादनात नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत आणि सूक्ष्म नियोजनाच्या सहाय्याने देखभाल-दुरुस्ती, भांडवली कामात सातत्याने सुधारणा करण्यात येत असल्याने दैनंदिन कामात सकारात्मक बदल दिसून येतोय. असे असले तरी स्पर्धेच्या युगात नवनवीन आव्हानांचा सामना करताना आपल्याला कार्यक्षमतेत अधिक वाढ करावी लागणार आहे. महानिर्मितीच्या उज्ज्वल भविष्याचे आपण भागीदार असल्याचा अभिमान वाटेल असे सांघिक कार्य करण्यास सर्वांनी तत्पर राहण्याचे तसेच प्रत्येकाने जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी केले. ते वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी प्रकाशगड मुख्यालय येथे बोलत होते. महानिर्मितीचा १९ वा वर्धापन दिन व शिवराज्याभिषेक दिन प्रकाशगड मुख्यालय येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी महानिर्मितीचे संचालक (वित्त) बाळा साहेब थिटे, संचालक (संचलन) संजय मारूडकर, संचालक (खनिकर्म) डॉ. धनंजय सावळकर तसेच महानिर्मितीचे सर्व कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते, मुख्य महाव्यवस्थापक, आणि अन्य वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. वीज संचाची उपलब्धता कार्यक्षमता वाढ, बाजारातील स्पर्धा, विविध क्षेत्रातून महसूल वाढीवर लक्ष आणि औष्णिक उत्पादनाकडून नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राकडे महानिर्मितीची यशस्वी वाटचाल सुरू असून महानिर्मितीचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. पी. अनबलगन यांनी सांगितले. संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे यांनी महानिर्मितीचे विविध आर्थिक स्त्रोत तपासताना महानिर्मिती व्हीजन २०३५ नुसार स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी प्रत्येकाने आपले यथायोग्य योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर संचालक (संचलन) संजय मारूडकर यांनी महानिर्मितीचा १८ वर्षांच्या प्रवासाचा तुलनात्मक आढावा घेतला आणि विक्रमी कामगिरी हा यातील केवळ एक टप्पा असून कार्यसुधारणा करण्यास भरीव संधी असून प्रत्येकाने वैयक्तिक जबादादारी घेत काम करावे असे आवाहन केले. संचालक (खनिकर्म) डॉ. धनंजय सावळकर यांनी आगामी पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षांच्या तुलनेत मुबलक कोळसा साठा उपलब्ध असल्याचे तसेच महानिर्मितीच्या माध्यमातून मागील वर्षी एकूण विविध संवर्गातील १,११७ उमेदवारांना थेट नियुक्ती देण्यात आली असल्याचे विषद केले. झपाट्याने बदलत्या क्षेत्रात भरपूर संधी आहे.
तसेच दैनंदिन कामकाजाचे डिजिटल तंत्रज्ञानात रूपांतर करून गतिमानता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित कार्यकारी संचालक व क्षेत्रीय कार्यालयांतील मुख्य अभियंते यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे समयोचित मार्गदर्शन केले. मागील वर्षांमध्ये महानिर्मितीच्या अनेक वीज निर्मिती संचांनी अखंडित वीज निर्मितीचे अनेक विक्रम प्रस्थापित केले असून राज्यातील वीजग्राहकांना सातत्यपूर्ण वीज पुरवठा करणेकरता उत्तरोत्तर अशीच वीज निर्मिती करत राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज नागदेवते, विवेक रोकडे, राजेश पाटील, नितीन चांदुरकर, डॉ. नितीन वाघ, पंकज सपाटे तसेच मुख्य अभियंते संजय कुºहाडे, श्रीमती. विजया बोरकर, राहुल नाळे, प्रसन्न कोटेचा, चंद्रशेखर होळंबे, दत्तात्रय साळुंखे, सुनिल सोनपेठकर, राजेश कराडे, शशांक चव्हाण, आणि मुख्य महाव्यवस्थापक आनंद कोंत, पंकज शर्मा, कंपनी सचिव राहुल दुबे, विधी सल्लागार सुमंत कोल्हे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजुरकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांनी केले.