भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : रेल्वे स्थानकावरून ज्या पद्धतीने बंटीबबलीने सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. त्यावरून ते दोघे बाळ चोरणारे सराईत गुन्हेगार असावे, असा संशय आतापर्यंतच्या घटनाक्रमातून पुढे आला आहे. चिमुकला नजरेस पडताक्षणीच त्या दोघांनी त्याचे अपहरण करण्याचा कट रचला असावा, असाही संशय आहे. अपहृत बाळाची आई भिक मागते. ती मुळची मध्य प्रदेशातील आहे. तिच्यासोबत पतीसारखा राहणारा तरुण वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून तो नागपुरात मिळेल ते काम करतो अन् काम नाही मिळाले तर भीक मागून खातो. दोन वर्षांपूर्वी हे दोघे एकमेकांना दिसले अन् ते नंतर पती-पत्नीसारखे एकमेकांसोबत राहू लागले. मिळेल ते खायचे. कधी ताजबाग, कधी रेल्वे स्थानक तर कधी कुठेही जागा मिळेल, तेथे झोपायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. बुधवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास भिक मागणारी तरुणी आरोपी बंटीबबलीजवळ आली. तिने पाच-दहा रुपये द्या, असे म्हटले. तिच्या कशित चिमुकला पहूडला असल्याचे दिसताच बंटी-बबलीने त्याच्या अपहरणाचा कट रचला.
महिला आणि तिच्या पतीला विश्वासात घेत खाऊ-पिऊ घातले. त्यांना चांगला रोजगार देण्याचे आमिष दाखवले. आम्ही दोघे प्रेमविवाह करण्यासाठी घरून पळून आलो. तुमच्यासोबत आज राहू, असे म्हणत तुम्ही कुठे राहता, अशी विचारणा केली. आमचे काही घर नाही, जागा मिळाली तेथे झोपतो, असे भिक्षेकरी दाम्पत्याने म्हणताच या बंटी-बबलीने त्यांना सायंकाळच्या गाडीने शेगावला दर्शनाला जाऊ, असे म्हटले. गाडीला वेळ असेपर्यंत रेल्वे स्थानकावर राहू, असेही म्हटले. नंतर आरोपी महिला बाळाच्या आईला घेऊन रेल्वे स्थानकावर आली. तर, चिमुकल्याच्या पित्याला घेऊन आरोपी तरुण गणेशपेठमधील बारमध्ये गेला. तेथे त्याला आरोपीने यथेच्छ दारू पाजली. ५६० रुपयांचे ‘दारूचे बील आरोपीने फोन-पे ने चुकते’ केले. रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सेवाग्राम एक्सप्रेसची शेगावला जाण्यासाठी चार तिकिट काढली.