भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळालं असून नरेंद्र मोदी हे तिसºयांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी काही खासदारांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातील सहा खासदारांना यंदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. यामध्ये महायुतीतील शिंदे गट आणि भाजप खासदारांचा समावेश आहे. मात्र महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचे म्हटलं जातंय. तसेच मंत्रिपदावरुन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रस्सीखेंच सुरु असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात सुरु आहे.
यावरुनच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधत अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४ जागांवर निवडणूक लढवली होती. सुनील तटकरे हे रायगड मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे खासदार आहेत. अशातच केंद्रीय मंत्रिमंडळात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोघेही इच्छुक असल्याचे म्हटलं जात आहे. यावरुनच राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याची चर्चा आहे.
यावरुन रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना मोठा दावा केला आहे. महायुतीमध्ये जाण्याचा सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलयांनाच झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. “मंत्रिपद मिळवण्यावरुन राज्यसभेच्या वेळी देखील असाच वाद झाला होता. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी हात धुवून घेतले होते. चार वर्षांचा कार्यकाळ असताना देखील प्रफुल्ल पटेल यांनी सहा वर्षांचा कार्यकाळ घेतला. अजित पवारांना त्यात काही मिळालं नाही.
आतासुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्यामागे ईडीची कारवाई होती ती निघून गेली. मात्र अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावरील कारवाया तशाच चालू आहेत. त्यामुळे शरद पवार यांना सोडून जे नेते महायुतीमध्ये गेलेले आहेत त्यात सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेल यांचा झाला. मी त्यांचे अभिनंदन करतो. अजित पवार यांच्या पक्षाला आता मंत्रिपद दिलं जाणार नसेल तर त्याचा एकच अर्थ आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे राहणार नाही. भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याशिवाय अजित पवारांकडे पर्याय राहणार नाही,” असा दावा रोहित पवार यांनी केला.