भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दुचाकीने जाणाºया एका प्रॉपर्टी डीलरवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास शहरातील छोटा गोंदियातील किसान चौक येथे घडली. महेश दखने (३५, रा. छोटा गोंदिया) असे हल्ल्यात गंभीर जखमीचे नाव आहे. महेश यांची प्रकृति चिंताजनक सांगीतली जाते. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनस्थळावरून पसार झाले. माहितीनुसार महेश दखने हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३५ एव्ही ने किसान चौक येथे गेले. यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी जान्हवी आॅटो रिपेअरिंग सेंटर पुढे ऊभी केली.
एवढ्यातच जवळच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी महेश यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार केले. यात ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले. यावेळी हल्लेखोरांनी घटनस्थळावरून पळ काढला. हा प्रकार परिसरातील नागरकांच्या लक्ष्यात येताच घटनास्थळावर एकच गर्दी केली. यातून एकानेही त्यांना रुग्णालयात नेण्याची तसदी घेतली नाही, गर्दी पाहून वचन खंदारे नामक व्यक्ती तेथे पोहचले. त्यांनी माजी नगरसेवक लोकेश यादव यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठून जखमी महेश दखणे यांना डॉ. बहेकर यांच्या रुग्णालयात दाखल केले, अति रक्तस्त्रावाने ते बेशुद्ध झाले. वैद्यकीय सुत्रांनी त्यांंची प्रकृती चिंताजनक सांगीतली. घटनेची माहिती शहर पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळा गाठून पाहणी केली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पाठविण्यात आले आहे. दरम्यान एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. महेश दखणे हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. जुने वैमनस्य किंवा आर्थिक व्यवहारातून त्यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा आहे.