भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- ४ जून ला देशातील लोकसभेचे निकाल लागले आणि निकालातून समोर आलेल्या आकडेवारीतून एन.डी.ए. ची बहुमत कडे वाटचाल दिसून येताच सत्ता समीकरण चे जुळवाजुळव सुरू झाली. त्या दिवसापासून एन.डी.ए. ची प्रत्येक बैठकीत आपली उपस्थिती दर्शविणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल पटेलांना या केंद्रातील मोदी ३ या सरकार मध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता बळावली होती. तसेच सर्वत्र समाज माध्यम आणि प्रमुख माध्यमातून पण असेच झडकत होते.
पण ९ जून ला दिल्लीत सुरू असलेल्या मोठ्या घडामोडीतून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात येत असल्यामुळे आणि ते या पूर्वी केंद्रीय मंत्री राहिलेले असल्यामुळे त्यांनी नकार दिला. आणि अंतिम क्षणी त्यांचा मंत्री पदाचा यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले. अखेर रविवारी झालेल्या शपथ विधी समारंभात त्यांना केंद्रीय मंत्री पद देण्यात आले नाही त्यामुळे संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. आज १० जून ला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात झेंडा वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेस चा २५ वा वर्धापन साजरा केला व वर्धापन दिनानिमित्त शपथ ही घेण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित झाले होते.
जिल्हा अध्यक्ष प्रेम रहांगडाले, युवा जिल्हाध्यक्ष केतन तुरकर सह इतर प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवार ९ जून रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी ला मिळत असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री पदावरून खलबत्ते सुरू होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे लोकसभेत निवडून आलेले एकमेव खासदार सुनिल तटकरे यांचे नाव पुढे करण्यात आले. पण त्यांची मुलगी आदिती तटकरे राज्यात मंत्री असल्यामुळे एकाच घरी दोन मंत्रिपद देता येत नसल्यामुळे सुनिल तटकरे यांची ही संधी हुकली. असे असले तरी गोंदियातील खा. प्रफुल पटेल यांच्या कार्यालयात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त एकत्र आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यात नाराजी पसरली असल्याचे दिसून आले आणि असे त्यांनी माध्यमा समोर व्यक्त ही केली.