भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लोकसभा निवडणुकीत आलेला निकाल हा नक्कीच आश्चर्यचकित करणार आहे. मात्र मतदारांचा कौल स्वीकारणे हीच खºया अर्थाने खेळाडू वृत्ती आहे. मागील पाच वर्षात मतदार संघासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी जे जे करणे शक्य झाले ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ज्या त्रुट्या राहिल्या त्या शोधून आणि आलेल्या निकालाचे चिंतन नक्कीच करू. मात्र पराभवानंतर खचून जात मतदारसंघाशी आणि मतदारांशी नाळ तुटली असा समज कुणाचा असेल तर तो नक्कीच चुकीचा आहे. मी ज्या ताकतीने आणि विकासाच्या मानसिकतेने मागील पाच वर्ष मतदारसंघात काम केले त्याचप्रमाणे यापुढेही आपण जनतेची कामे करत राहणार. लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेण्यासाठी असलेले जनसंपर्क कार्यालय पुढेही लोकांसाठी कायम सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन माजी खा.सुनिल मेंढे यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेत केले. मागील कार्यकाळात हाती घेतलेल्या कामांपैकी काही कामे प्रगतीपथावर आहेत. भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लोकसभा मतदार संघातील रेल्वे स्थानकांचा कायापालट, भंडारा बायपास मागार्ची निर्मिती, भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामागार्ची निर्मिती अशा अनेक महत्त्वपूर्ण कामांना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सुनिल मेंढे यांनी यावेळी सांगीतले.
गोंदिया जिल्ह्यातील विमानतळ, अपूर्ण असलेले राष्ट्रीय महामार्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम, ड्रायपोर्ट या सारख्या कामानाही पूर्णत्वास नेऊन गोंदिया जिल्ह्याच्या विकासात भर घालण्याचा प्रयत्न आपण करणार असुन पराभव झाला म्हणून मतदारांवर नाराज होत त्यांच्यापासून पळ काढणे हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या अंगी नाही. मी कायम या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी असून त्याच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सदैव सोबत असल्याचेही मेंढे यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला मा.खासदार सुनिल मेंढे यांच्या सोबत डॉ. उल्हास फडके, रामकुमार गजभिये, अनुप ढोके, प्रशांत खोब्रागडे, विनोद बांते, मयूर बिसेन, सचिन कुंभलकर, प्रमोद धार्मिक, अविनाश ब्राम्हणकर, अक्षय गिरडकर, नंदू राजपुरोहित, सुशील पडोळे, सौ.कुंदा वैद्य, व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.