भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाची भरती १९ जूनपासून होत आहे. ११० पोलीस कर्मचारी जागांसाठी ८ हजार २६ उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले आहे. त्यामुळे एका जागेसाठी तब्बल ७३ उमेदवार रिंगणात आहेत. ही पोलीस भरती अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या विविध ग्राऊंडवर ७० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे पोलीस भरतीची प्रत्येक बाब टिपणार असल्याचे पोलीस अधॉीक्षक निखिल पिंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
गोंदिया जिल्हा पोलिस भरतीची संपूर्ण भरती प्रक्रिया गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथे १९ जून २०२४ रोजी सकाळी ५ वाजतापासून घेण्यात येणार आहे. ही पोलीस शिपाई भरती जवळजवळ १७ दिवस चालणार आहे. पोलिस शिपाई११० जागांसाठी ८ हजार २६ अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे सर्वप्रथम महिला उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात येणार आहे. १६०० मीटर, ८०० मीटर, १०० मीटर, गोळा फेक, उंची, छाती मोजने संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरीत्या व्हिडीओग्राफी, सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहे. या भरतीसाठी जिल्हाभरातून पोलीस अधिकारी कर्मचारी मागविण्यात आले आहेत.