भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गणेशपूर ते पिंडकेपरला जोडणाºया नाल्यातून गोसे धरणाचे बॅकवॉटर तसेच वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने बाधित होणाºया गणेशपूरला सुरक्षित करण्यासाठी नाल्यालगत सुमारे १५ फूट उंच प्रोटेक्शन भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र या प्रोटेक्शन भितीमुळे जुना नागपूर नाका परिसर तसेच भोजापूर येथील नागरिकांना पुराचा अधिक धोका वाढला असून पुर येण्यापूर्वी प्रशासनाने उपाय योजनाकरण्याची नागरिकांची मागणी आहे.
गोसे धरणाचे बॅक वॉटर किंवा नदीला येणारे पुराचे पाणी आधी गणेशपुर लगतच्या लोकवस्तीत पसरायचे. त्यामुळे जुना नागपूर नाका परिसरात हळूहळू पुराची पातळी वाढत होती. मात्र आता प्रोटेक्शन भिंतीमुळे अडलेले पुराचे पाणी पिंडकेपार नाल्यामार्गे दवडीपार लगत असलेल्या जुन्या रेल्वे लाईन पूलाखालच्या नाल्यात पुराच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होईल, परिणामी जुना नागपूर नाका परिसर व भोजापूरच्या लोकवस्तीत जलदगतीने पुराचे पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. मागील १९९४ पासून याच नाल्यातून येणाºया पुराचा पाण्यामुळे गुजराती कॉलोनी, महात्मा फुले कॉलोनी, भोजापूर तसेच जुना नागपूर नाका परिसरातील नागरिक पुरबाधित झाले असून दरवर्षी येणाºया पुरामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे सततच्या पुराने नागरिक त्रस्त आहेत.