जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष अधिवेशनात सरकारला जाब विचारणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्यासाठी वणवण करताना अनेक माता भगिणींनी आणि लहान मुलामुलींनी जीव गमावला आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण राज्य सरकार मात्र फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे आणि कमिशन घेणे यात मश्गूल आहे. सरकारला लोकांच्या जगण्या मरण्याचे काही घेणे देणे राहिले नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, जून महिना संपत आला तरी अद्याप राज्याच्या अनेक भागात पाऊस पडलेला नाही. जनता भयंकर दुष्काळाचा सामना करत आहे.

लोकांना प्यायला पाणी नाही जनावरांना चारा नाही. राज्यात टँकर माफिया आणि बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये उष्माघाताने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पण सरकार कुठे दिसत नाही. राज्य एवढ्या भयंकर परिस्थितीचा सामना करत असताना सत्ताधारी पक्षाचे मंत्री परदेशात जाऊन थंड हवा खात आहेत. राज्यात उष्माघाताने किती लोकांचा मृत्यू झाला आहे हे सरकारने जाहीर करावे. परदेशात जाण्यासाठी मंत्र्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते या मंत्र्यांनी ती परवानगी घेतली आहे का? यांचा परदेश दौ-याचा खर्च कोण करत आहे? या प्रश्नांची उत्तरे सरकारने जनतेला दिली पाहिजेत. काँग्रेस पक्ष आगामी अधिवेशनात या सर्व मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरून जाब विचारणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *