भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्रिपद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी तीन पालकमंत्र्यांना आरोप आणि कारवाई झाल्यामुळे पालकमंत्रिपद सोडावे लागले होते. त्यातच आता विद्यमान पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनीसुद्धा प्रकृतीचे कारणामुळे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी तोंडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवसांपूर्वीच कळविल्याची माहिती आहे. त्यामुळे गोंदियाचे नवे पालकमंत्री कोण याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडेआठ महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आले.
ना. आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. गोंदिया जिल्हा याच गटाचे खा. प्रफुल्ल पटेल यांचा गृहजिल्हा असल्याने ना. आत्राम यांच्यावर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ना. धर्मरावबाबा आत्राम हे मूळचे गडचिरोली येथील रहिवासी आहे. मागील एक महिन्यापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा झाली. त्यामुळे प्रकृती बरी राहत नाही. त्यामुळे त्यांना गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणे प्रकृतीच्या दृष्टीने शक्य होत नसल्याने त्यांनी ही जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र त्यांचे स्वीय सहायक राजेश पुरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. तसेच पालकमंत्रिपद सोडण्याबाबत दोन दिवसांपूर्वी ना. आत्राम यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून कळविले असल्याचे सांगितले. त्यामुळे आता जिल्ह्याचे नवे पालकमंत्री कोण, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.