भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : घरगुती क्षुल्लक वाद झाला, त्यातून संपत्तीचा वाद निघून सदर वाद विकोपाला गेल्याने लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि. १९) च्या रात्री ९ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील इर्री येथे घडली. हरिराज प्रेमलाल मेंढे (३३, रा. इर्री) असे मृताचे नाव आहे. तर मुन्ना प्रेमलाल मेंढे (२७, रा. इर्री) असे आरोपी लहान भावाचे नाव आहे. संपतीच्या वादातून दोन्ही भावांत बुधवारी रात्री ९ वाजता वाद सुरू झाला. अशात वाद विकोपाला गेल्याने लहान भाऊ मुन्ना याने मोठ्या भावाच्या डोक्यावर उभारीने वार केले.
हरिराज याला तत्काळ उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु जखम मोठी असल्याने तत्काळ जखमीला नागपूर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच हरिराज यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. आरोपी मुन्ना मेंढे याला अटक करण्यात आली. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी रात्रीच या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. उपचारादरम्यान हरिराजचा नागपुरात मृत्यू झाल्याने आता कलम ३०२ अंतर्गत वाढ करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक काळे करीत आहेत.