भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहरातील कुंभारेनगर येथील आंबेडकर भवनाजवळ उज्ज्वल मेश्राम (१७) या युवकाची धारदार शस्त्र व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना १८ जूनच्या रात्री ९.३० वाजता सुमारास उघडकीस आली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आज (ता.२०) पोलिसांनी तीन आरोपींना जाळ्यात अडकविले. यामुळे उज्ज्वल मेश्राम हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या चार झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल प्रशांत शेंडे (२०), प्रणय गौतम नागदेवे (२०) दोन्ही रा. सिंगलटोली व हर्ष संजय बोंबार्डे (१९) रा. भिमनगर यांचा समावेश आहे. भिमनगर येथील द्ददु उर्फ उज्ज्वल निशांत मेश्राम (१७) हा रात्रीचे जेवण करून फेरफटका मारत असताना आरोपींनी त्याला बोलावून कुंभारेनगर येथील आंबेडकर भवनाजवळ नेले.
दरम्यान धारदार शस्त्र व दगडाने ठेवून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत तपासकायार्ला सुरूवात केली. आरोपीच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांचे पथक कामाला लागले. दरम्यान शोधचक्र फिरवून अंकित घनश्याम गुर्वे (२२) रा.सिंगलटोली याला ताब्यात घेण्यात आले. जुन्या वैमनस्यातून अंकितची हत्या केल्याची कबूली आरोपीने दिली. तर दुसरा आरोपी राहुल प्रशांत शेंडे रा.सिंगलटोली हा फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. फरार आरोपीच्या शोध घेत असतानाच आज (ता.२०) पोलिसांनी राहुल प्रशांत शेंडे, प्रणय गौतम नागदेवे व हर्ष संजय बोंबार्डे या तिघांना अटक केली. यामुळे हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या चार झाली आहे. पोलिस आरोपींची कसून चौकशी करीत असून हत्या प्रकरणात आणखी काही दडले आहे का? याचे तपास केले जात आहे.