मुंबई : गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्रिपद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी तीन पालकमंत्र्यांना आरोप आणि कारवाई झाल्यामुळे पालकमंत्रिपद सोडावे लागले होते. त्यातच आता विद्यमान पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सुद्धा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. राज्याचे अनन व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे आठ महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवसांपूर्वीच कळविल्याची माहिती आहे. तसेच, यासंदर्भात अजित पवार यांनाही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.