भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. याविषयी वारंवार तक्रारी करूनही तोडगा निघत नाही. नगरपरिषदेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम यांच्या माध्यमातून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांना देण्यात आले. विशेष म्हणजे पाणी भरण्यासाठी या भागात सार्वजनिक नळजोड नगण्य आहे. त्यामुळे नळाला पाणी आले नाही, तर नागरिकांची पाण्यावाचून मोठी गैरसोय होते. सदर दिवसाआड एक तास पाणी द्या, परंतु ते पूर्ण दाबाने मिळायला हवे. शिवाय पाण्याची वेळ निश्चित असणे गरजेचे आहे. सध्या कमी दाबाने व अवेळी पाणी मिळत असल्याने सर्व कामे सोडून पाणी सुटण्याची वाट पहावी लागते. नियमित पाणीपट्टी भरूनही पुरेसे पाणी मिळत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. आता कंत्राटदारकडून तर रस्त्याच्या खोदकामामुळे पाणीदेखील वेळेत मिळत नाही. त्यामुळे शहरातील विविध भागात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
तुमसर नगरपरिषद लोकसंख्येने मोठी आहे. स्वच्छता अभियानांतर्गत नावलौकिक मिळाला, परंतु काही दिवसांपासून शहरातील हनुमान नगर, गांधी नगर व रविदास नगर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतआहे. परिसरात पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करण्याबाबत नगरपरिषदेचे नियोजन ढासळले आहे. नियमित पाणीपुरवठा वेळेत होत नाही. याबाबत गांभीर्याने विचार करून तत्काळ पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख रोशन ढोके, चंद्रकला मलेवार, गौरी देशमुख, शोभा भुरे, मीरा बडवाईक, शैला वाकरकर, पुष्पा बडवाईक, मनीषा रहांगडाले, नलिनी कुर्वे, जाकीर तुरक, प्रदीप वाहने, प्रशांत चौरे, सुशांत बेले, बुरान तूरक, मातवेंद्र डोंगरे, रिता सांडेकर, सुधीर शेंदरे, प्रभूदास खोब्रागडे, रमा चौरे, सचिन रामटेके उपस्थित होते.