भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : राजकारणाच्या चक्रव्यूहात चांदपूर जलाशयाच्या यंत्रणेने जलाशयात १९ फूट पाणी शिल्लक ठेवून काय साध्य केले? असा सवाल उन्हाळी धानपिक लागवडीपासून वंचित असलेल्या ६ गावातील शेतकºयांनी केला आहे. ६ गावातील शेतकºयांचा घात करून शिल्लक पाणी हा बोटिंगचा व्यवसाय चालविण्यासाठी तर ठेवण्यात आला नाहीना असा प्रश्न उलट टपाली वंचींत शेतकºयांनी केला आहे. शेतकºयांसाठी वरदान असलेला चांदपूर जलाशय आता राजकारणाचा आखाडा बनला की काय असा जंगी टोला परिसरातील शेतकºयांनी लगावला आहे. जर हीच परिस्थिती असली तर नियोजना अभावी जी गावे वंचित झाली आहेत. पुढील सत्रात पुन्हा वंचित राहण्याची शक्यता आहे.
रोटेशन पद्धतीचा फटका पुन्हा वंचित गावांनाच बसणार आहे. श्रेय घेण्यासाठी राजकीय दबावात केलेला रोटेशन हा चुकीचा आहे यात बदल होणे आवश्यक आहे. चांदपूर जलाशय हा शेतकºयांचा आहे. राजकीय नेत्यांचा नाही अशी प्रखर प्रक्रिया शेतकºयांनी व्यक्त केली आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदीच्या पात्रातून निरंतर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. चांदपूर जलाशयाच्या उजव्या कालव्या अंतर्गत अंतिम टप्प्यात पाण्याचा वाटप केल्यानंतर जलाशयात १८ ते १९ फूट पाणी शिल्लक आहे. हे पाणी शिल्लक ठेवून काय साध्य केले असा सवाल शेतकरी वर्ग उपस्थित करीत आहे.
यावर्षी रोटेशन पद्धतीने उजव्या कालव्या अंतर्गत उन्हाळी धान पिकाच्या लागवडीसाठी चांदपूर जलाशयाचे पाणी काही गावांना वितरित केले आहे. पाणी वितरण करतांना नियोजित निर्णय घेण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या सिहोरा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उजव्या कालव्या अंतर्गत गावे निश्चित करण्यात आले होते. अखेरच्या टप्प्यात पाणी वाटप करतांना जलाशयात असलेल्या शिल्लक पाण्यावर नियंत्रण ठेवले जाते. दरम्यान यावर्षी उजव्याकालव्या अंतर्गत मुरली, सोनेगाव, बोरगाव, मच्छेरा व सिहोरा गावांच्या शेतशिवाराला उन्हाळी धान पिकाच्या लागवडीतून वगळण्यात आले आहे. एकाच कालव्यावर गावे असल्या नंतरही जलाशयाचे पाणी सिंचनासाठी पुरेसा होणार नसल्याचे कारणावरून डच्चू देण्यात आले. ही एक शोकांतिका आहे.