उल्हास तिरपुडे भंडारा : जिल्ह्यात महाविद्यालये, कोचिंग तसेच विद्यार्थी व विद्यार्थी पालकांनी शिक्षण घेण्याची एक नविनच पद्धत आणली असून या पद्धतीद्वारे एखाद्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला शुन्य हजेरीपटावर नाममात्र दाखला घ्यायचा आणि शहरातल्या खासगी कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घ्यायचे हा प्रकार सर्रास सुरू आहे. या माध्यमातून कोचिंगसोबतच महाविद्यालयांनीही पैशाच्या मोहापाई आपली दुकानदारी सुरु केली आहे. मात्र याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असून शैक्षणीक गुणवत्तेवर याचा परीणाम होत आहे.
यामुळे शिक्षणप्रणाली कुणाकडे चालली याचा शोध संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याला चांगले गुण मिळावे व त्याचा नंबर इंजिनिअर, एमबीबीएस ला लागावे याच उद्देशाने सध्याची शिक्षणप्रणाली जिल्ह्यात सुरु आहे. यासाठी आपल्या पाल्यांच्या तो काहीही करायला तयार आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षणासाठी अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दहावी उत्तीर्ण झाल्याबरोबर भंडारा तसेच नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोचिंग क्लासेसला प्रवेश घेतले जात आहेत. परंतु, भंडारा जिल्ह्यातील एखाद्या खेडेगावातीलकनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला नाममात्र प्रवेश घेऊन ठेवला जातो. संबंधित विद्यार्थी या महाविद्यालयात थेट परीक्षेलाच उगवतो. परंतु, त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मात्र परिणाम होत आहे. त्यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून यावर कोणीतरी आवर घालायला पाहिजे अशी मागणी करु लागले आहेत.