भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी सिताराम दास महाराज, श्री संत हनुमान दास महाराज, श्री संत शंकर बाबा, सत्यपाल महाराज आदींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कान्हळगावच्या तपोभूमीतील ह.भ.प. जयसिंग कस्तुरे महाराज लोधी समाजातील पहिले कीर्तनकार ठरले आहेत. आयुष्यातील प्रत्येक संकट नवीन शिकवण असते. संकटातून नवीन संधीचा जन्म होतो. धैर्य व कठोर परिश्रम यशाकडे घेऊन जाते. अशीच संकटातून पायवाट काढणारे जयसिंग कस्तुरे महाराज कान्हळगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून चौथा वर्ग उत्तीर्ण झाले. ते सहा महिन्याचे असतानाच त्यांच्या आईचे देहावसान झाले. बापाने दुसरे लग्न केले. वडील गाव सोडून नेरला रामटेक येथे राहायला गेले. बाबाचे छत्र मिळेल या अशाने जयसिंग महाराज बाबांकडे गेले खरे पण, त्यांच्या वाट्याला तेथील एका मालकाच्या घरी अवजड काम करायला लागले. बापाने टाकून दिले पण त्या मालकाने सांभाळून घेतले. तेरा वर्षाचे असताना जयसिंग महाराज सालई खुर्द येथील आपल्या मामांच्या घरी आले. मामांकडे दहा वर्षे राहिले. मामांच्या घरची व शेतीच्या कामाला त्यांनी मनापासून हातभार लावले. मामांच्या घरी जयसिंग कस्तुरे महाराजांना भक्तीची ओढ लागली.
बालपणातच ते हनुमंताची पूजापाठ करू लागले होते. किर्तन ऐकणे त्यांच्या व्यासंग झाला होता. भजन गायन सुद्धा करू लागले. त्यांचे प्रथम गुरु आंधळगाव येथील महादेव बाबा डोंगरवार आहेत. डोंगरवार महाराज संत गुलाब बाबांचे सच्चे अनुयायी होते. आंधळगाव येथे एका कार्यक्रमाला संत गुलाब बाबा आले होते. त्यावेळी जयसिंग महाराज यांना संत गुलाब बाबा यांच्या समक्ष पहिले कीर्तन करण्याच्या मान मिळाला होता. त्याच ठिकाणाहून जयसिंग महाराजांना भजन व कीर्तनांचा छंद जडला. कान्हळगाव तपोभूमीत तपस्या करणारे श्री संत हनुमानदास (अण्णाजी) महाराज हे माडगी येथे आल्यानंतर तब्बल सात वर्ष श्री संत अण्णाजी महाराज यांच्या आश्रमात जयसिंग महाराजांना सेवा करण्याची संधी मिळाली. तिथेच त्यांना भक्ती रुपी पाठ अवगत झाले. श्री संत अण्णाजी महाराज यांच्याकडून आशीर्वाद व भक्तीचे धडे मिळाले. त्यानंतर भंडारा येथील संत ज्ञानेश आश्रमात आळंदीचे वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश प्रसाद रत्नाकर महाराज यांच्या वास्तव्यात राहून त्यांच्या आश्रमात साधना करण्याची संधी मिळाली. त्याच काळात त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यात साधूंच्या आश्रमात तेरा दिवस राहून हरी चिंतन, राम कथा, भागवत, गीता पाठ आधी भक्तीरसाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते परत पुन्हा भंडारा येथे आले.
ह.भ.प. रत्नाकर महाराज यांच्या सानिध्यात राहून रत्नाकर महाराजांकडून संस्कृत पाठ शिकून घेतले. रत्नाकर महाराज यांच्यामुळेच त्यांना संस्कृत विषयाचे शिक्षण मिळाले. संस्कृत विषयाचे पठण केले. त्यामुळे ते रत्नाकर महाराजांना आपले गुरु मानतात. २००४ मध्ये जयसिंग महाराजांचे मामाने लग्न लावून दिले. लग्नानंतर मात्र ते कान्हळगाव या स्वगावी आले. त्यांनी गावात गुरुदेव महिला मंडळाची स्थापना केली. त्यांच्यामुळेच गावात महिलांचा भजन मंडळ तयार झाला आहे. जयसिंग महाराज प्रपंच साधून किर्तन, भागवत, प्रवचन करीत असतात. वास्तुपूजन व लग्नकार्याच्या शुभमंगल दिनाला सत्यनारायणाच्या कथेचे पूजनही करतात. विविध भागवत सप्ताह, दही काला कार्यक्रमात त्यांना बोलावले जाते. विविध मंगल कार्याला त्यांच्या हाताने पूजा केली जाते. भक्ती मार्ग त्यांचा स्थायीभाव असल्यामुळे त्यांना गावात व पंचक्रोशीत जयसिंग महाराज या नावाने ओळखले जाते. जयसिंग महाराजांनी प्रपंचाकडे पूर्ण लक्ष देत शेतीचाही मूळ व्यवसाय सांभाळ करीत आहेत.