रेती माफियांच्या मुस्क्या आवळण्यासाठी २८ जूनला होणार ब्राह्मणटोला येथे रास्ता रोको

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : रेती माफियांचे गृह क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या रेतीमाफीया विरुद्ध महालगाव ते नाकाडोंगरी रस्त्याची दुरुस्ती करणे व क्षमतेपेक्षा अधिक होणाºया जड वाहतुकीवर आळा बसविण्यात यावे, या मागणीसाठी २८ जून रोजी तुमसर बालाघाट राज्य मार्गावरील ब्राह्मण टोला येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, एसपी, एसडीओ, आमदार, तहसीलदार व पोलीस प्रशासनाला सुद्धा सादर करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सरपंच पारस भुसारी यांनी सांगितले. नागरिकांना स्वस्त दरात रेती उपलब्ध व्हावी म्हणून तुमसर तालुक्यातील सोंड्या व वारपिंडकेपार बावनथडी नदी घाटावर शासकीय रेतीचे डेपो सुरू करण्यात आले आहेत. परंतु रेती डेपोच्या नावाखाली रेती तस्करांनी बावनथडी नदीपात्रातील रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून मोठंमोठे डम्पिंग यार्ड तयार केले आहेत. यात महसूल विभागाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. मात्र या रेती चोरीला आळा घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महालगाव ते नाकाडोंगरी रस्त्यावरून ओव्हरलोड रेतीचे ट्रक रात्रंदिवस धावत असल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. वाहन धारकांना वाहन चालवितांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अनेक अपघात झाले आहेत.

खड्डयात दडले रस्ते शोधा म्हणजे सापडेल अशी गत या रस्त्याची झाली आहे. याच रस्त्यावरील खड्डयांमुळे रस्त्याच्या कडेला ओव्हरलोड रेतीचे ट्रक पलटी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ओव्हरलोड ट्रकमुळे ब्राह्मणटोला येथील पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन वारंवार फुटत आहे. गावकºयांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. ब्राह्मणटोला येथील सरपंच पारस भुसारी यांनी या संबंधी पोलीस विभाग, महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा तक्रार वजा निवेदने दिली होती. मात्र या समस्येवर दखल घेण्याचे अवचित्य कुणीही दाखविले नाही, ही एक शोकांतिकाच आहे. यात रेती तस्करीला पाठबळ कोणाचे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महालगाव ते नाकाडोंगरी रस्त्याची दुरुस्ती करा व ओव्हरलोड वाहतुकीला आळा घाला या मागणीसाठी महालगाव व ब्राह्मणटोला येथील नागरिकांनी शासन व प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला असून ब्राह्मणटोला येथे २८ जूनला रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती सरपंच पारस भुसारी यांनी दिली आहे. रस्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व महालगावचे सरपंच पारस भुसारी, वारपिंडकेपारचे सरपंच दिनेश गोमासे हे करणार असून या रास्ता रोको आंदोलनात सोंड्या व धुटेराचे सरपंच तसेच परिसरातील नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने भाग घेणार आहेत. परिसरातील त्रस्त नागरिकांनी आता ‘अभी नही तो कभी नही’असा सूत्र हाती घेतला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *