जल पर्यटनाच्या वाढीव विकास आराखड्यास मंजुरी देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :-आमचे सरकार हे सर्व सामान्यांचे व शेतकºयांचे सरकार असून शेतकºयांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंर्तगत केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा असे बारा हजार रुपये, सानुग्रह अनुदान व धानाला सातशे रुपये बोनस देणार हे पहिलं सरकार आहे. आता ५४७ कोटी रुपये खर्च करून भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. १०२ कोटी रुपये खर्च करुन जलपर्यटन सुरु होत आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील जल पर्यटनासोबतच ५४७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. वैनगंगा जलाशयातील जल पर्यटनाच्या वाढीव आराखड्यास मान्यता देण्याचे व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त (तीन एप्रिल ) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. जलपर्यटन केंद्राचा प्रथम टप्पा, भूमिगत गटार योजना, अमृत योजने अंतर्गत भंडारा आणि पवनी येथील तलाव सौंदर्यीकरण, नगरोत्थान अभियाना अंतर्गत रस्ते बांधकाम, भंडारा व पवनी नगर परिषद अंतर्गत वैशिष्टपुर्ण योजनांची कामे, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत भंडारा व पवनी नगर परिषदमध्ये विविध विकासकामे, जिल्हा क्रिडा संकुल भंडारा येथे विविध सुविधा, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध कामे या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न झाला. आज होत असलेल्या विकास कामांमुळे भंडारा जिल्ह्याला पर्यटकांची पहिली पसंती मिळणार आहे. जल पर्यटनाच्या साध्याच्या १०२ कोटीचा आरखडा २०० कोटीचा करावा अशी मागणी आमदार भोंडेकर यांनी आपल्या भाषणात केली होती. यावर वाढीव विकास आराखड्याला मंजुरी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

५४७ कोटी रुपये खर्च करून होणाºया विकास कामामुळे भंडारा बनणार पर्यटन विकासासोबतच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे आजची विकास कामे मार्गी लागली आहेत असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. १०२ कोटी रुपये खर्च करून गोसेखुर्द जलाशयात जल पर्यटन सुरू करण्यात आले आहे. या कामाचा विकास आराखडा वाढवून २०० कोटी रुपये करण्याची मागणी त्यांनी केली. ३ एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. महिला बचत गटांसाठी भंडारा येथे २०० गाळ्यांचे व्यापार संकुल उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले. आजच्या भुमिपूजनातील विशेष उल्लेख करण्याजोगा प्रकल्प म्हणजे जलपर्यटन प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार निमीर्ती होईलच पण भंडारा जिल्हा भारताच्या नकाशावर अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल असा विश्वास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केला. आज भूमिपूजन झालेल्या सर्व कामांचा एकत्रीत परिपाक म्हणजे जिल्ह्यातील नागरी पायाभूत सोयी सुविधा आणि क्रिडा विषयक सोयीसुविधा यांची दर्जोन्नती होण्यामध्ये निश्चितच मदत होणार आहे असे ते म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *