भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहरात मागील ८ दिवसांपासून अघोषित पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मजिप्राच्या वतीने करण्यात येणाºया पाणी पुरवठ्यात खंड पडल्याने शहरात हाहाकार सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे. मजिप्राने क्षतिग्रस्त पाईपलाईनचे काम सुरळीत केले तर आता महावितरणने ग्रहण लावल्याने पाणी पुरवठा सुरळीत होण्यास व्यत्यय निर्माण होत आहे. हा प्रकार १८ जूनपासून सुरू आहे. पण एकही जनप्रतिनिधी समस्यांची दखल घेताना दिसून आले नाही. गोंदिया शहराला डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरात मजिप्राचे घरगुती, वाणिज्यीक, संस्था व नगर परिषद असे जवळपास २५ हजाराहून अधिक नळ कनेक्शन धारक ग्राहक आहेत. या ग्राहकांना एकवेळ पाणी पुरवठा केला जातो. परंतु, १८ जून रोजी पांढराबोडी गावशिवारात गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम करीत असताना पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली. याची माहिती मिळताच मजिप्राच्या अधिकाºयांनी पाणी पुरवठा बंद करून पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू केले.
यामुळे तीन दिवस पाणी पुरवठा खंडीत राहिला होता. यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण होवून पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू होती. त्यातच मजिप्राच्या वतीने पाईपलाईन दुरूस्त करण्यात आल्याने २१ जून रोजी पाणी पुरवठा सुरळीत झाला. त्यातच महावितरणचे विघ्न निर्माण झाले. शुक्रवारी रात्रीपासून पाणी पुरवठा योजनेच्या हिवरादासगाव फिडरमध्ये बिघाड आल्याने पाणी पुरवठा बंद पडला. या पाणी टाक्यांमध्ये दिवसातून दोन वेळा पंप सुरूकरून पाणी साठविले जाते. टाक्या भरण्यासाठी पंप पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी विशिष्ट दाबाने विद्युत पुरवठा होणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी टाकी भरण्यास अडचण होत असते. त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. २१ जूनपासून सुरू असलेला तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरूस्त न झाल्याने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडितच होता. त्यामुळे पाणी टाक्यांमध्ये पाणी भरण्यात आले नाही. परिणामी मंगळवार (ता.२५) पर्यंत अर्ध्याहून अधिक शहराला पाणी टंचाईची झळ सोसावी लागली. २५ जून सायंकाळी पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला असून डांर्गोली येथून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे मजिप्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यातील व्यत्यय दूर होणार, असे वर्तविले जात आहेत.