भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला ५३ वर्षीय इसम नागपूर येथील रुग्णालयात मृत्युशी झुंज देत असताना अखेर दहा दिवसानंतर त्यांची प्राणज्योत मालावली. त्यानंतर आर्थिक मदत व पाल्याला नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी मृतदेह थेट उपवनसंरक्षक कार्यालयात आणून आंदोलन करण्यात आले. आर्थिक मदत मंजुरीसाठी सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन वनाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रवीण सिताराम वासनिक (५३, रा. खुटसावरी, ता. भंडारा) असे मृत इसमाचे नाव आहे. ते एमआयडीसी येथील एका कंपनीत मजूर म्हणून कार्यरत आहेत.
रविवारी (दि. १६ जून) रोजी कामे आटोपून ते दुचाकीने स्वघरी जात होते. दरम्यान खुटसावरी ते गडेगाव डेपो फाट्यादरम्यान असलेल्या चिखली तलावाजवळील रोपवाटीकानजीक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर डॉक्टरांनी नागपूर येथे रेफरकरण्याचा सल्ला दिला. त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र २५ जून रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरची स्थिती बेताची व कमावता इसम मृत पावल्याने त्यांच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावला आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परीवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी खुटसावरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.