भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील शिवनीबांध धरण परिसराजवळ मारुती व्हॅन आणि इंडिका व्हिस्टा यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जण गंभीररित्या जखमी झाले.सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार इंडिका व्हिस्टा एमएच-३६ अ.३२३४ मधील चालक इम्रान खान सोबत मोनीश खान हे साकोलीहून सानगडीकडे जात असताना विरुद्ध दिशेने मारुती व्हॅन ओम्नी एमएच ३१-उ.फ.-१४०६ चा चालक मोरेश्वर सोनवणे लवारी उमरी व साथीदार दुर्वास कापगते,शेंदूरावाफा,सानगडीहून साकोली कडे येत होते.
शिवणी बांध जवळील परीसरात दोन्ही कार भरधाव वेगात एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे चारही जण गंभीररित्या जखमी झाले. साकोलीयेथील रहिवासी इम्रान खान व मोनीश खान यांना अग्रवाल खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र मारुती ओम्नीमध्ये प्रवास करणारे मोरेश्वर सोनवणे आणि दुर्वास कापगते हे दोघेहीओम्नी वाहनात अडकले त्यांना लोकांच्या मदतीने चालकाची सीट व गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. दोन्ही गंभीर जखमींना प्राथमिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात साकोली येथे नेण्यात आले. मात्र दोन्ही गंभीर जखमी असल्याकारणाने जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पीएसआय प्रशांत वाटोळे, संतोष शिंदे, गुलाब घासले, यांनी वेळीच पोहोचून मदत कार्य सुरू करून जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी पोहोचविण्यात आले अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत .