भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजनेच्या निधी वाटपात मोठया प्रमाणात गौडबंगाल झाल्याचे दिसुन येत असुन याची चौकशी करून संबंधीत दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विकास फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तुमसर यांना निवेदन देण्यात आले असुन लाभार्थ्यांना त्रास दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे. तुमसर तहसील कार्यालयातील संगायो विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांना शासनाकडुन विविध योजनेचे अनुदान वाटप केले जाते.याकरीता प्रथम लाभार्थ्याने आॅनलाईन अर्ज भरतांना त्यामध्ये त्याच्या बँक खात्याची आावश्यक संपुर्ण माहिती अर्जासोबत भरण्यात येते तसेच आॅनलाईन केलेल्या अर्जाची सत्यप्रत आवश्यक सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात सादर केली जाते.व त्यानंतर लाभार्थ्यांचे अर्ज मंजुर झाल्यानंतर त्याला नव्याने त्याच्या संपुर्ण बँक खात्याची कागदपत्रांची पुनश्च मागणी करण्यात येते. निराधार योजनेचा लाभ देतांना तहसील कार्यालयामार्फत लाभार्थ्यांकडुन तीन वेळा त्याच्या बँक खात्याची माहिती प्राप्त केली जाते.असे असतांना तुमसर तालुक्यातील जवळपास सर्वच लाभार्थ्यांना त्यांनी दोन लाभाची उचल करून शासनाची दिशाभुल केल्याचा आरोप लावुन लाभार्थ्याला लाभाचे पैसे शासनास जमा करण्याची ताकीद देणे व तसे न केल्यास लाभार्र्थ्याला शासनाच्या योजनेपासुन वंचित करण्याच्या धमकीचे पत्र देण्यात आले आहे.
कर्मचाºयांनी केलेल्या चुकांचे दोष लाभार्थ्यांवर ठेवुन शासकीय समितीने मंजुर केल्यानंतरही पात्र लाभार्थ्याची थट्टा करण्याचे काम तुमसर तहसील कार्यालयातील संगायो विभागाकडुन केल्या जात आहे. या प्रकारातुन या विभागात मागील अनेक वर्षापासुन अशाच प्रकारे भ्रष्टाचार सुरू असल्याचे या कृतीमधुन दिसुन येत आहे.करीता सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. लाभार्थ्यांना शासन स्वत: अनुदान देत असल्याने लाभार्थ्यांना मिळालेला कुठलाही अतिरिक्त दिलेला निधी ते परत करू शकणार नाही हे लाभार्थ्यांच्या आजच्या परिस्थिीवरून दिसुन येते. करीता संगायो विभागातील संबंधीत दोषी अधिकारी-कर्मचारी यांचेकडुन शासनाने अनुदानाचा गैरप्रकार केल्याप्रकरणी वसुली करावी अशी मागणी विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली असुन गरज पडल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.