भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करण्यात येत असुन त्यामुळे शासनाचा करोडो रूपयांचा महसूल बुडत आहे.करीता सुरू असलेले अवैध रेती उत्खनन तात्काळ थांबविण्यात यावे असे निर्देश खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी, सूर नदी, बावनथडी नदी, चुलबंद नदी, वाघ नदी, येथील घाटावरून, नदीपात्रातून सर्रास अवैध रेतीचे उत्खनन केले जाते.त्यामुळे करोडो रूपयांचा महसूल बुडत आहे. याकडे संबंधीत अधिकारी जाणीवपुर्वक कानाडोळा करीत असतात. जिल्ह्यातील नदीघाटात जेसीबा व पोकलँडच्या साहाय्याने रेती उपसा करून ट्रक,टिप्पर व टॅ्रक्टर द्वारे वाहतूक केली जाते. रस्त्याने ओव्हरलोड वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे. शासनाने अजूनही काही रेती घाटाचे लिलाव केलेले नाही, त्यामुळे अनेक रेती माफीया या व्यवसायात सक्रिय झाले आहेत. रोज रात्री व दिवसा अवैधरित्या रेतीचे उत्खनन केले जात आहेत. विना नंबर प्लेटच्या वाहनांतुन अवैधरीत्या रेतीची वाहतुक होत असतांना वाहतूक विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येते. आर्थिक देवाण घेवाणीमुळे संबधीत अधिकारी कारवाही करण्यास धजावत नसल्याची चर्चा आहे.
संबधीत अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने रेती माफिया सक्रिय झाले असून त्यांची दहक्षत निर्माण झाली आहे. याच अवैध रेती व्यवसायातुन गुन्हेगारी तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रेतीच्या ओव्हर लोड वाहतुकीमुळे शहरी व ग्रामीण भागात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. घरकुल लाभार्थ्यांना आजही पुरेशी रेती मिळत नाही. अनेकदा लेखी अर्ज करून सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना पाहिजे तेव्हा रेती दिल्या जात नाही. महसूल विभाग, पोलिस विभाग, खनिज विभाग, वाहतूक विभाग यांनी तात्काळ अवैध रेतीचे उत्खनन थांबवून रेती माफियांवर तातडीने कारवाई करावी असे निर्देश भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी प्रशासनाला दिले आहे.