भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : जंगलातून भटकून गावात आलेले अस्वल थेट पोलिस ठाण्यात घुसल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यात अस्वल शिरल्याचे पाहिल्यानंतर काही काळ पोलिस कर्मचा-यांचीमध्येही खळबळ माजली. मात्र अस्वलामुळे कोणताही अपघात झाला नसल्याची माहिती आहे. सदर प्रकार २ जुलै रोजी रात्री ८ वाजता तालुक्यातील दिघोरी/मोठी पोलिस ठाण्यात पहावयास मिळाला. लाखांदूर तालुक्यातील बहुतांश गावे घनदाट जंगल व्याप्त आहेत.
या जंगलातील वन्य प्राण्यांचे आवागमन अनेकदा गावश्-िावारात होते. साकोली-वडसा राष्टÑीय महामार्गालगत असलेल्या घनदाट जंगलातून स्थानिक दिघोरी/मोठी शेतशिवारात सुध्दा काही वन्यप्राणी अनियमितपणे आढळून येतात. दरम्यान मंगळवारी रात्री येथील पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी आपल्या कार्यालयीन कामात व्यस्त असताना अचानक जंगलातून भरकटलेले अस्वल पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या आवारात शिरले. पोलिस ठाण्याच्या इमारतीत अस्वल दिसताच काही काळ कर्मचा-यांमध्ये भिती निर्माण झाली. परंतु काही वेळातच या अस्वलाने कुणालाही इजा न पोहचविता परत जंगलाच्या दिशेने काढता पाय घेतल्याने पोलिस कर्मचा-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.