भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : जुन्या घराची भिंत कोसळून त्या खाली दबून एका इसमाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज ७ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील करांडला येथे घडली. या घटनेत योगेश खुशाल देशमुख वय (३५) रा.करांडला यांचा या भिंतीमध्ये दबून दुदैवी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, घटनेतील मृत योगेश देशमुख यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे, घटनेच्या दिवशी योगेश देशमुख हा सकाळी शेतावरील काम करून घरी परतला. आणि दुपारच्या सुमारास आपल्या जुन्या घराशेजारी काही काम करीत होता. दरम्यान, एकाएक जुन्या घराची मातीची भिंत कोसळली. त्यामुळे, भिंतिशेजारी काम करीत असलेला योगेश हा त्या भिंतीच्या मलब्यात दाबल्या गेला. सदर घटना कुटुंबीयांसह शेजाºयांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीची बोलावणी करीत योगेश देशमुख यांना मलाब्यातून बाहेर काढले आणि तत्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली.
या माहितीवरून लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेच्या पंचनामा केला . आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठवले. या घटनेत भिंत पडून त्याखाली दबून योगेश देशमुख यांचा मृत्यू झाला असून शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. योगेश देशमुख यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, एक चिमुकली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आजच स्थानिक करांडला येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधीच्या कार्यक्रम पार पडला .