भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरालगतच्या ग्राम भोजापुर येथील टेलीफोन कॉलोनी ठाकरे ले आऊट मधील मिलींद जनबंधु ते श्रीमती खेडीकर यांच्या घरापर्यंतचा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुन नागरीकांना या रस्त्याने प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.विशेष म्हणजे भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एक वर्षाअगोदर या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपुजन केले होते मात्र अद्यापही या रस्त्याचे बांधकाम न झाल्याने नागरीकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. भोजापूर ग्राम पंचायत अंतर्गत येणाºया टेलीफोन कॉलनी, ठाकरे ले आउट येथील मिलींद जनबंध व ठवकर ते रमेश मेश्राम ते श्रीमती खेडकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता कच्चा स्वरूपात असुन पावसाळ्यात या रस्त्यावर मोठया प्रमाणात चिखलाचे साम्रात्य असते. सदर रस्त्यावर पावसाळयात मोठया प्रमाणात पाणी साचुन राहते .नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या ग्राम पंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असुन त्या रस्त्यावर मागील दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा मलबा किंवा मुरूम टाकण्यात आलेले नाही त्यामुळे सदर रस्त्याने प्रवास करतांना नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याठिकाणी अनेक नागरीक घसरून पडले तर अनेक दुचाकी वाहनचालकांचा अपघात होवुन त्यांना दुखापत झाली आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते एक वर्षाअगोदर दिनांक २५ फेब्रु. २०२३ रोजी भोजापुर ग्राम पंचायत अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमाच्या बोर्डावर मुद्दा कं. ४ मध्ये श्री. मिलींद जनबंधू ते श्री. रमेश मेश्राम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम म्हणून रस्ता मंजूर झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. सदर बॅनर बोर्डावरील बहुतेक सर्व कामे पूर्ण झाल्याचे समजले परंतू श्री. मिलींद जनबंधू ते श्री. रमेश मेश्राम चा सिमेंट रस्त्याचे बांधकाम अद्यापपर्यंत झालेले नाही. तसेच सदर रस्त्याला सांडपाण्याच्या विस्थापनेकरीता पक्की नाली नसल्याने तेथील रहीवाश्यांना दैनदिन सांडपाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. संपूर्ण घरांचे पाणी रस्त्यांवर येत असल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचले आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असुन रोगराई किंवा संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.यासंदर्भात येथील नागरीकांनी भोजापुर ग्राम पंचायत प्रशासनाला अनेकदा निवेदन देत सदर रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यासंदर्भात तसेच सांडपण्याचा निचरा होण्याकरीता नालीचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली मात्र नागरीकांच्या निवेदनाकडे ग्राम पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येते. सदर रस्त्याचे पक्के बांधकाम करणे शक्य नसल्यास तात्पुरत्या स्वरूपात सदर रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे अशी मागणी रमेश मेश्राम,रविंद्र बांगळकर,आनंद बुरडे तसेच परिसरातील नागरीकांनी केली आहे.