भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शैक्षणिक सत्र सुरू होऊन २ आठवडे लोटत असताना पालक वर्गातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक समस्या तोंड वर करू लागल्या आहेत. शिक्षकांचा तुटवडा त्यातील प्रमुख समस्या असून जि.प. शाळेत विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे. त्यातूनच तुमसर मोहाडी विधानसभेत मोडणाºया पालकांची समस्या थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पोहोचली आहे. भाजपचे नेते प्रदीप पडोळे यांनी सदर समस्येला वाचा फोडून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा तुटवडा दूर करण्यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात जि.प. शाळेत पटसंख्या व इयत्ता निहाय शिक्षक नसल्याने विद्यार्थी दजेर्दार शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे स्पष्ट केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी सदर निवेदनावर तत्काळ तोडगा काढण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावेळी पडोळे यांच्या सह भाजपचे मोहाडी तालुकाध्यक्ष भगवान चांदेवार, कुणाल मोहतुरे, संतोष डुंभरे व कार्यकर्ते उपस्थित होते.