गोंदिया : खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व सालेकसा या आदिवासी क्षेत्रातील रस्ता दर्जोन्नतीचे कामे होणार आहेत. यासाठी शासनाने ९.५० कोटीचा निधी मंजूर केला आहे. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील प्रस्तावित विकास कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी खा. पटेल यांच्याकडे केली होती. खा. पटेल यांनी आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्त मंत्रालय व आदिवासी विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाने ९.५० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व सालेकसा या आदिवासी क्षेत्रातील रस्ता दर्जोन्नतीचे कामे होणार आहेत. विशेष म्हणजे अर्जुनी मोरगाव व सडक अजुर्नी या दोन तालुक्यात जवळपास २९ विकासकामे केली जाणार आहेत. यासाठी ९ कोटीहून अधिकचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विकासकामांच्या माध्यमातून आदिवासीबहुल क्षेत्रातील नागरिकांच्या दळणवळण विषयक समस्या मार्गी लागून दिलासा मिळणार, असे मत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केले आहे.