भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राज्यातील महाराष्ट्र उमेद महिला कंत्राटी कर्मचारी व कल्याणकारी संघटनेच्या वतीने न्याय मागण्यासाठी आझाद मैदान येथे भर पावसात आंदोलन सुरू आहे. मागील अधिवेशनात सुद्धा या आंदोलकांना सरकारने आश्वासन देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. एकीकडे माझी लाडकी बहीण योजना राबवत असताना सरकार आपली पुर्व आश्वासने पूर्ण न करता आपल्या बहिणींना न्यायीक हक्कासाठी भर पावसात, चिखलात आंदोलन करण्यास भाग पाडत आहे ही अत्यंत दुदैर्वी बाब आहे. विधानसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्यातील उमेद महिला कंत्राटी कर्मचारी व कल्याणकारी संघटनेचे प्रश्न आज ११ जुलै रोजी सभागृहात मांडून सरकारला धारेवर धरले. यापूर्वीही सरकारने त्यांना खोटे आश्वासन देऊन फसवले आहे,
यावेळी अशी फसवणूक न करता या माता-भगिनींच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आग्रही भूमिका पटोले यांनी सभागृहात मांडली. उमेद ग्राम जिवनोत्ती अभियान ,ग्राम विकास विभाग व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमीत विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्यांच्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्तींना शासनाच्या सेवेत संकश पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करावी जेणेकरून ग्रामीण भागाच्या विकासासाठी निरंतर काम करतांना मदत होईल. प्रभाग संघ स्तरावर केडर मध्ये कृषी व्यवस्थापक,पशु व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक, प्रभाग संघ व्यवस्थापकांना इतर उमेद अभियानातील केडर प्रमाणे मानधनात वाढ करून पूर्ण वेळ काम देण्यात यावे या संस्थांच्या सक्षमीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा आंदोलकांच्या या दोन महत्त्वाच्या मागण्या सरकारने तातडीने मंजूर करून उमेद महिला कंत्राटी कर्मचारी व कल्याणकारी संघटनेचे समाधान करावे अशी मागणी नाना पटोले यांनी सभागृहात केली.