भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : खाजगी शिकवणी वर्गांशी साटेलोटे करून तेथील विद्यार्थ्यांना नामधारी प्रवेश देणाºया कनिष्ठ महाविद्यालयांना यापुढे मोठ्या कारवाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यापुढे प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी विद्यालयांना घ्यावी लागेल. नियमित वेळापत्रकानुसार विद्यार्थी सातत्याने गैरहजर आढळल्यास अशा विद्यालयांची मान्यताच रद्द करण्याचा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आदेशात दिला आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी ८ जुलै रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. शहरातील व बाहेरील अनेक विद्यालयांचे खाजगी शिकवणी वर्गांशी साटेलोटे असते व त्यामुळे या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना नामधारी प्रवेश दिले जात असल्याच्या मौखिक व लेखी तक्रारी प्राप्त होत असल्याचे याआदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविना शाळा सुरू आढळल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा आदेशात देण्यात आला आहे. एवढेच नाही तर ज्या विद्यार्थ्यांची नियमित वेळापत्रकानुसार उपस्थिती आढळून आली नाही, त्यांना बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही, अशीही ताकीद या आदेशात देण्यात आली आहे.