नागपुरात मुसळधार पाऊस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकरांना रविवारी बरसलेल्या पावसाने दिलासा दिला. पावसामुळे महालमध्ये नागनाल्यालगतची भिंत कोसळली. ग्रामीण भागातही पावसाला जोर असून गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी त्याचे स्वरुप सार्वत्रिक नव्हते. काही भागात पाऊस तर काही भाग कोरडा असेच चित्र होते. शहरात उकाड्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. रविवारी दुपारनंतर शहराच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडला. रस्त्याच्या खोलगट भागात पाणी साचले. वातावरणातही गारवा तयार झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

दुपारच्या पावसामुळे बर्डीच्या बाजारपेठेत विक्रेते व ग्राहकांची तारांबळ उडाली. वधार्मार्गावरील मेट्रोच्या पुलाखाली अनेक जण पावसापासून बचाव करण्यासाठी थांबलेले होते. मेडिकलचौकातही पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. महालमधील तुळसीबाग परिसरात नागनाल्याला लागून असलेली स्वामी समर्थ सेवा केंद्राची संरक्षक भिंत कोसळली. अनेक दिवसाच्याप्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावले आहे. पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र या पावसाने सध्या तरी हा धोका टळला आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या उकाड्यामुळे नागरिक वैतागले होते त्यांनाही पावसाची प्रतीक्षा होतीच. पावसाळ्याचा एक महिना उलटल्यावरही काही भागाचा अपवाद वगळता अन्यत्र पावसाचे प्रमाण कमीच होते. छोट्या आणि मोठ्या धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नव्हती. अशीच स्थिती राहिल्यास पुढच्या काळातपाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *