भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शेतात काम करताना वीज पडून, साप चावून, ट्रॅक्टर उलटून, वीजेचा करंट लागून मरण पावणाºया व्यक्तींच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये मदत शासनाने द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडारा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे. साप हा वन्य प्राणी असून साप मारल्यास कायदेशीर गुन्हा दाखल होतो.
भंडारा जिल्हा हा धानाचा जिल्हा असून विषारी आणि बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात आढळतात. ते ओळखता येत नसल्यामुळे दरवर्षी शेतात काम करणाºया शेतमजुरांचा तसेच शेतमालकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. मात्र त्यांच्या कुटुंबांना कोणतीच आर्थिक मदत मिळत नाही. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्याचप्रमाणे शेतात काम करताना साप चावून, शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून, ट्रॅक्टर उलटून, वीजेचा करंट लागून मरण पावणाºया व्यक्तींच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये मदत शासनाने द्यावी. अशा अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना १५ लाख रुपये आर्थिक मदत करावी. ज्यांच्या शेतातील शेतमालाचे रानडुकराने नुकसान केले त्या शेतकºयांना शासनाकडून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून सदर निवेदन जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या मागण्यांचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, नितेश बोरकर, चंद्रशेखर खोब्रागडे, दशरथ शहारे, आदेश खगार, प्रज्वल राकडे, लक्ष्मण गायधने यांनी दिले.