भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील भृशुंड गणेश मंदिर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मांडोदेवी या तिर्थस्थळांचा समावेश करण्यात यावा, या विषयाला घेऊन माजी खासदार सुनील मेंढे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. राज्य शासनाने तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ केला. वयाची साठ वर्षे पूर्ण करणाºया व्यक्तींना शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या तीर्थस्थळी दर्शन घडविले जाणार आहे. या योजनेच्या पार्श्वभूमीवर तीर्थस्थळाच्या यादीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील काही मंदिरांचा समावेश करण्याच्या मागणीला घेऊन सुनील मेंढे यांनी हा पत्रव्यवहार केला आहे. आपल्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकास अधिकच गतिमान झाला आहे. विकासा सोबतच लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोकहित साधण्याचे काम आपण करीत आहात. पावसाळी अधिवेशना दरम्यान अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या काही योजना नक्कीच आपल्या प्रगल्भतेचीआणि लोकाभिमुखतेची जाणीव करून देणाºया आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन घडविण्याची “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” खरोखर ज्येष्ठांचा सन्मान करणारी आहे.
ज्या तीर्थस्थळांचे या योजनेच्या माध्यमातून दर्शन घडविले जाणार आहे, त्यात महाराष्ट्रातील विविध तीर्थस्थळांचा समावेश आहे. परंतु भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील एकाही मठ, मंदिराचा समावेश नाही. विदभार्तील अष्टविनायका पैकी एक महत्त्वाचे असलेले भृशुंड गणेश मंदिर भंडारा येथे आहे. दुरून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. गोंदिया जिल्हात मांडोदेवीचे जागृत मंदिर आहे. निसर्गरम्य अशा परिसरात वसलेले हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या दोन्ही तीर्थस्थळांचा समावेश योजनेत करून महाराष्ट्रातील अन्य भाविकांना या स्थळांच्या दर्शनाचा लाभ व्हावा, या दृष्टीने निर्णय घ्यावा अशी विनंती या पत्राद्वारे सुनील मेंढे यांनी केली आहे. तीर्थ दर्शन योजनेच्या मंदिरांच्या यादीत समावेश झाल्यास साहजिकच या भागाचा विकास होऊन या निमित्ताने रोजगारलाही चालना मिळेल, असेही सुनील मेंढे यांनी म्हटले आहे.