भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पवनी विकास आराखडा, गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्प,जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटीक ट्रॅक व अन्य कामासह लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी आज आॅनलाईन बैठकीत दिले.नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या या बैठकीत खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भौंडेकर हे आॅनलाईन उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,पोलीस अधिक्षक लोहीत मतानी,मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्यासह अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्पाचे सादरीकरण पर्यटन महामंडळाचे जलतज्ञ सारंग कुळकर्णी यांनी केले.त्यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकल्पाला गती देण्याबाबत मत मांडले तर श्री.गावीत यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी या प्रकल्पाचे लोकार्पणाच्या दृष्ट्रीने काम करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्हयातील अंमलबजावणीचे सादरीकरण महीला व बालविकास अधिकारी मनीषा कुरंसुगे यांनी केले .त्यामध्ये आजपर्यत ६६ हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.या योजनेची सर्वकष अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच तालुकास्तरीय समितीनी कामाला गती दयावी व पात्र माता भगींनीना या योजनेचा लाभ दयावा,असे श्री.गावीत म्हणाले. कृषी विभागाच्या लाख व शिंगाडा उत्पादन प्रकल्पाविषयी लवकरच या प्रकल्पस्थळी भेट देण्याचे त्यांनी आश्वस्त केले. खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी ही चर्चेत सहभाग घेतला.आज झालेल्या बैठकीतील कामांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करण्याचे श्री.गावीत यांनी सांगितले.