भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील यशोदा नगर परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून जवळच असलेल्या नाल्यातून पाणी वाहून गेले. विशेष म्हणजे उन्हाळ्यात अनेकदा या भागात टँकरने पाणीपुवठा करण्याची वेळ येते. ज्या भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो त्या भागात अशाप्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एनकॅप निघाल्यामुळे नवीन जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे फवारा तयार झाला. या प्रकारामुळे अर्धा रस्ता पाण्यात खचला. सध्या शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम अनेक प्रभागांमध्ये सुरू आहे. शहरातील खात रोड येथेही अनेक ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून यशोदा नगर येथे महिनाभरापूर्वी नगर पालिकेने जलवाहिनी टाकली आहे. या परिसरात पाणी पुरवठा करणाºया अंदाजे साडेसात लाख लीटर पाणी साठवणूक क्षमता असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. या दोन्ही टाक्यांमध्ये याच जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी भरले जाते. उन्हाळ्यात परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने पाण्याचा प्रश्न सोड- विण्यासाठी येथे नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. मात्र, आज सकाळी अचानक या जल वहिनीची एनकॅप निघाल्याने पाण्याचा जोरदार फवारा निघू लागला. पाण्याच्या वेगामुळे रस्ता खचून रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला. चार ते पाच तास पाणी वाहत राहिल्याने लाखो लीटर पाणी नाल्यात वाहून गेले. परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती देताच नगर पालिका कर्मचाºयांनी येऊन एनकॅप लावली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.