सिहोरा 24 जुलै – मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सिमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या पुलावर अंदाजे 2 ते 3 फुटाचे वर पाणी असल्यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा संपर्क आज रात्री 8 वाजे पासुनच तुटला आहे. पोलीस प्रशासन,महसुल विभाग व वन विभागाची यंत्रना मात्र सज्ज असून नियंत्रणावर पाळत ठेवून आहे.पाण्याची पातळी वाढल्यास बपेरा गावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बपेरा बावनथडी व वैनगंगा (संगम) नदी दोन्ही तुडुंब भरून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे शेत शिवाराला सुद्धा तलावाचे स्वरूप आले आहे.धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वैनगंगा नदीच्या पुरामुळे परसवाडा येथील शेतकऱ्यांची 50 एकर शेती पाण्यात बुडाली असून वैनगंगा नदीच्या पुराची पातळी वाढत चालली आहे.सध्या पाण्याची पातळी वाढत असली तरी पूर परिस्थिती मात्र नियंत्रणात असून अजून कुठेही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही.
नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याची गरज आहे.सततचा पाऊस व मध्य प्रदेशातील प्रकल्पाचे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे बपेरा बावनथडी व वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.जर हीच परिस्थिती असल्यास नदी काठावरील गावांना धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.वृत्त लिहीपर्यंत पूर परिस्थितीत बदल झालेले नाही हे येथे उल्लेखनीय आहे.